‘क्वारंटाईन’ होण्याच्या आदेशाचं उल्लंघन, मुंबईत 150 तबलिगी जमातींवर FIR दाखल

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीत तबलिगी जमातचा कार्यक्रम झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक तबलिगी दाखल झाले होते. यानंतर महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आणखी वाढला. यानंतर अनेक तबलिगीना राज्य सरकारकडून क्वारंटाइन करण्यात आले आहे. परंतु आता राज्य सरकारने मुंबईत 150 तबलिगी जमातच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये क्वारंटाइन आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी 150 तबलिगी जमातच्या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

आयपीसी (कलम 271) अंतर्गत क्वारंटाइन आदेशाचा भंग आणि आयपीसी (कलम 188) अंतर्गत सरकारच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी या 150 तबलिगींविरुद्ध मुंबईत पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याशिवाय आयपीसी कलम 269 नुसार देखील एफआयआर नोंदविण्यात आली आहे.

दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकजमध्ये सहभागी झालेले 1400 तबलिगी राज्यात आल्याने प्रशासनाची झोप उडाली. मात्र यातील साडे तेराशे जणांपर्यंत पोहोचण्यात प्रशासनाला यश आले. परंतु अजूनही 50 जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही. या 50 जणांनी लवकरात लवकर स्वत:हून पुढे यावे आणि कोरोना चाचणी करुन घ्याव्यात. अन्यथा आम्ही योग्य कारवाई करु असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. त्यानंतर आता 150 तबलिगींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.