लखनौमध्ये ‘तांडव’च्या विरोधात पोलिसात तक्रार, विशिष्ट समुदायाच्या भावना भडकवण्याचा आरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आलेली वेब सीरिज तांडव ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका विशिष्ट भागावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याप्रकरणी काही ठिकाणी तक्रारही दाखल करण्यात आली होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ‘तांडव’च्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अमेझॉन प्राईमच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित, तांडव वेब सीरिजचा दिग्दर्शक अब्बास अली, निर्माते हिमांशू कृष्ण मेबेर आणि लेखक गौरव सोलंकी यांच्यावर हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी भाजप नेते राम कदम यांनीदेखील घाटकोपर पोलीस स्थानकात याविरोधात तक्रार दाखल केली होती.

तांडव ही वेब सीरिज प्रकाशित झाल्यानंतर त्यामध्ये असलेल्या काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला होता. तसंच हिंदूंच्या भावना दुखावल्याचं म्हटलं होतं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडेही याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयानंही या कंटेंटबाबतअमेझॉनला प्राईमला उत्तर देण्यास सांगितलं आहे.

एका विशिष्ट समुदायाच्या भावना भडकावणं, देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात अयोग्य चित्रण करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसंच या वेब सीरिजचा इंटरनेटच्या माध्यमातून व्यापक प्रचार करण्यात येत आहे आणि त्यामुळे भावना दुखावल्या जात आहेत. यामुळेच एफआयआर दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. १५३A, २९५, ५०५ (१)(b), ५०५(२), ४६९, ६६, ६६f, ६७ या कलमांतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला.