पंढरपुर : आंदोलनप्रकरणी प्रकाश आंबेडकरांसह सुमारे 1200 आंदोलकांवर गुन्हा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   मंदीर खुले करण्यासाठी पंढरपुरातील आंदोलनाप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह एक हजारांपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

प्रकाश आंबेडकर यांनी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत काल पंढरपुरात आंदोलन केले. कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन प्रतिबंधात्मक आदेश असताना प्रकाश आंबेडकर यांनी 1100 ते 1200 लोकांचा जमाव जमवला. यावेळी त्यांनी मास्क घातला नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. संचारबंदी व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमामधील तरतुदीचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन घोषणाबाजी केली. यामुळे प्रकाश आंबेडकर, अरुण महाराज बुरघाटे, आनंद चंदनशिवे, धनंजय वंजारी, अशोक सोनोणे, सौ. रेखाताई ठाकूर, हभप नामद महाराज, बबन शिंदे, सागर गायकवाड, रवी सर्वगोड, गणेश महाराज शेटे आणि माऊली हळणवर या नेत्यांसह 1100 ते 1200 आंदोलकांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.