पुण्यात बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्या मेडिकलवर FIR दाखल, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणुच्या फैलावापासून बचाव करण्यासाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणावर सॅनिटायझरचा वापर करीत आहे. त्याचा गैरफायदा घेऊन परवाना नसलेले सॅनिटायझरची विक्री करत असलेल्या मेडिकल दुकानांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बनावट सॅनिटायझर घेऊन आलेल्या दोघांना अटक केली आहे.

कृणाल ऊर्फ सोनू शांतीलाल जैन (वय ३३, रा. पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा) आणि चेतन माधव भोई (वय २६, रा. गंगाधाम, मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अतिष शिवाजी सरकाळे यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना बिबवेवाडीमधील गंगाधाम फेज १ मधील सुरभी मेडिकलमध्ये १५ मार्च रोजी रात्री साडेआठ ते साडेदहा दरम्यान घडली.

भारतामध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे जनमानसामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी सॅनिटायझरची खरेदी मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. असे असताना नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणून विनापरवाना उत्पादित केलेले सॅनिटायझर विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

या औषधांच्या बाटल्यावर उत्पादकाचे नाव व पत्ता, उत्पादन क्रमांक, हा तपशील नाही. तसेच या औषधाचे खरेदी बिल उपलब्ध नाही, अशी माहिती असतानाही शासनाची व नागरिकांची फसवणुक करण्यात येत होती. हे औषध कोणाकडून व कसे प्राप्त केले याची त्यांच्याकडे कोणतीही माहिती नव्हती.

त्यामुळे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने गंगाधाम येथील सुरभी मेडिकलवर छापा घातला. त्यांच्याकडून ८ हजार ७७५ रुपयांच्या सॅनिटायझरच्या ११७ बाटल्या तसेच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. सहायक पोलीस निरीक्षक तासगांवकर अधिक तपास करीत आहेत.