‘कोरोनामुक्त’ रुग्णांचे स्वागत करणं पडलं महागात ! माजी महापौर मंगला कदम यांच्यासह चौघांवर FIR दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरातील संभाजीनगर येथील कोरोनामुक्त झालेल्या दाम्पत्याचे ढोल ताशाच्या गजरात काल मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. याप्रकरणी बेकायदेशीररित्या गर्दी जमा केली. तसेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चौघांविरोधात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नगरसेविका मंगला कदम रा.संभाजीनगर, अमेय सुधीर नेरूरकर रा.संभाजीनगर, कल्पेश गजानन हाने रा.सम्राट हौ.सोसा. संभाजीनगर, संतोष शिवाजी वराडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसे आदेश देखील दिले गेले आहेत. मात्र काल संभाजीनगर येथील कोरोनामुक्त झालेल्या दाम्पत्याचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले.

ढोल ताशांच्या गजरात या दाम्पत्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी झाली होती. सोशल मीडियावर देखील या स्वागताचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर देखील नागरिकांनी टिकेची प्रचंड तोफ झाडली होती. अखेर निगडी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी महापौर तसेच विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसून पुढील तपास निगडी पोलिस करत आहेत.