नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – FIR On Tahsildar Avinash Shembatwad | मूलबाळ होत नसल्यामुळे पत्नीला मारहाण करून तिच्यावरतीच पिस्तूल रोखणाऱ्या अधिकाऱ्याला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश शेंबटवाड असे आरोपी तहसीलदाराचे नाव असून सध्या ते कोठडीत आहेत. अविनाश शेंबटवाड गडचिरोली जिल्ह्यातील धानोऱ्यात तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. अविनाश शेंबटवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मगनपुरा भागात त्यांचे सासर असून पत्नीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Avinash Shembatwad)
अविनाश शेंबटवाड यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, आई- वडिलांनी त्यांचा विवाह दीड वर्षांपूर्वी अविनाश यांच्याशी मोठ्या थाटामाटात लावून दिला होता. लग्नामध्ये सर्वांना मानपान, सोने व अन्य साहित्य देखील दिले होते. लग्नानंतर तहसीलदार पती अविनाश यांच्यासह कुटुंबीयांनी त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. कर्तव्याच्या ठिकाणी सोबत असताना काही ना काही कारण काढून मारहाण करत असत, त्याचबरोबर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती पिस्तूलही रोखण्यात आले. सासरी मारहाण आणि पतीचा त्रास वाढल्याने आपण माहेरी गेल्याचे म्हंटले आहे. सासरी असताना मूलबाळ होण्यासाठी जादूटोण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. (Domestic Violence Act)
दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तहसीलदार पती अविनाश शेंबटवाड यांच्यासह त्यांची आई, वडील व डाॅक्टर असलेल्या दोन भावांच्या विरोधात देखील कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा ११ मार्च रोजी दाखल करण्यात आला आहे. अविनाश शेंबटवाड हे नांदेडमध्ये असल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना १३ एप्रिल रोजी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.