शिरूर : उपसरपंचावर वीज चोरीचा FIR दाखल

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा या गावच्या सरपंचावर फसवणूक आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच. शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील सणसवाडी गावच्या उपसरपंचावर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची घटना घडल्याने शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथे विद्युत वितरण विभागातील भरारी पथकाचे कार्यकारी अभियंता राजेश स्वामी तसेच त्यांचे सहकारी फेब्रुवारी २०२० मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वीज मीटरची पाहणी करत असताना सणसवाडी येथील लक्ष्मीबाई विश्वनाथ हरगुडे, नवनाथ विश्वनाथ हरगुडे, रामहरी विश्‍वनाथ हरगुडे यांच्या नावे असणारे विद्युत कनेक्शन मीटर असताना तेथील विद्युत मीटर वरून तेवीस खोल्या, एक बंगला तसेच पाच दुकानांना वीज पुरवठा होत असल्याचे त्यांना दिसून आले. तर या वेळेस मीटरची व्यवस्थित तपासणी केली असता त्या मीटरवरून चोरून विद्युत विद्युत प्रवाह सुरू असल्याचे सदर भरारी पथकातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले यावेळेस सदर विद्युत वितरण अधिकाऱ्यांनी ग्राहकांसमोर पंचनामा करून तपासणी केली असता हरगुडे यांच्या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या मागील दोन वर्षांचे तब्बल ३२९३२ युनिटचे वीज वापर झाल्याचे निदर्शनास आले त्यानंतर तपासणी करून ३१८२१ यूनिटचे सहा लाख ३५ हजार ९६० रुपये बिल उदंड रक्कम २६००० असे एकूण सहा लाख ६१ हजार ९६० रुपये विद्युत वितरण विभागात करण्याबाबतचे हरगुडे यांना सांगण्यात आले मात्र अनेक दिवस जाऊन देखील हरगुडे यांनी सदर रक्कम भरली नाही त्यामुळे विद्युत वितरण बारामती विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश गौरीशंकर स्वामी रा. सिद्धार्थ हाईटस भिगवन रोड ता. बारामती जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सणसवाडीचे उपसरपंच नवनाथ विश्वनाथ हरगुडे, लक्ष्मीबाई विश्वनाथ हरगुडे व रामहरी विश्वनाथ हरगुडे सर्व रा. सनसवाडी ता. शिरुर जि. पुणे यांच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा कलमानुसार गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण भालेकर व पोलीस नाईक तेजस रासकर हे करत आहे.