विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यावर बोगस रेमडेसिवीर बनवल्याप्रकरणी FIR, मीठ अन् ग्लुकोजपासून 1 लाखांहून जास्त बनावट Remdesivir बनवल्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या जबलपूर विभागाचे अध्यक्षासह तिघा विरोधात जबलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सरबजित सिंग मोखा, देवेंद्र चौरसिया आणि स्वपन जैन अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलम आणि ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती जबलपूरचे अतिरिक्त एसपी रोहित काशवानी यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, जबलपूर विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष असलेले सरबजित सिंग मोखा हे सिटी हॉस्पिटलचे मालक आहेत. देवेंद्र चौरसिया त्यांचे मॅनेजर म्हणून काम पाहतात, तर स्वपन जैन हे फार्मा कंपन्यांची डिलरशिप सांभाळतात. स्वपन जैन यांना सुरत पोलिसांनी अटक केली आहे, तर मोखा आणि चौरसिया अद्याप फरार आहेत. मोखा हे मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्याच्या मुलाच्या संपर्कात होते. त्यांनी इंदोर येथून 500 बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन्स घेऊन ती रुग्णालयात 35 ते 40 हजारांपर्यंत विकल्याची माहिती समोर आली आहे. गुजरात पोलिसांनी यापूर्वी सुरतजवळील एका फार्म हाऊसमधून दोघांना अटक केली होती. या ठिकाणाहून मीठ आणि ग्लुकोजपासून बनविलेले एक लाखांहून अधिक बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. दरम्यान, इंदोर पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या 11 जणांपैकी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसने बनावट रेमडेसिवीरच्या रॅकेटची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.