जामिनावर बाहेर येणार्‍या ‘भाई’चं स्वागत करण्यास गेलेल्यांवर FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – संचारबंदीत देखील गुन्हेगारीतील्या “भाई”चे चाहते गप्प नसून खूनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या भाईचे स्वागत करण्यासाठी या चाहत्यांनी येरवडा कारागृहा बाहेर गर्दी केली होती. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

लाला सिद्धू ठुसे (वय ३९, अष्टापूर, हवेली), गणेश दत्तात्रय चोंधे (वय ३८, रा. महंमदवाडी), गणेश पांडुरंग काळे (वय ३०,रा. वडगाव शेरी), सोपान नवनाथ मडके (वय २८, काळेपडळ), शिरीष अनिल कारले (वय २६, रा. खेरपाल, नगर), दादा बबन गव्हाणे (वय २८, रा. श्रीगोंदा नगर), योगेश लक्ष्मण गव्हाणे (वय २८, रा. श्रीगोंदा), नितीन भिकोबा सोडनवर (वय ३८, बोरीपार्धी, दौंड), संतोष हरिभाउ गव्हाणे (वय २८, रा. गव्हाणेवाडी, श्रीगोंदा), अंकुश विठ्ठल मल्लाव (वय ४०, रा. येरवडा), संदीप बापू जगदाळे (रा. करडे, शिरूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सचिन रणदिवे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात २०१५ मध्ये झालेल्या खूनप्रकरणात विष्णू यशवंत जाधव आरोपी आहे. दोन दिवसांपुर्वी त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका होणार होती. त्या पाश्र्वभूमीवर जाधवला घेउन जाण्यासाठी येरवडा कारागृहासमोरील रस्त्यावर ११ जणांनी गर्दी केली होती. संचारबंदीत सोशल डिस्टन्स न पाळता त्यांनी व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणली होती. शिवाय कोरोनाचा संसर्ग पसरविण्याची कृती केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे अधिक तपास करीत आहेत.