काँग्रेसच्या अडचणीत वाढ, धर्माचा वापर केल्याप्रकरणी मिलिंद देवरांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमदेवार मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेने केलेल्या तक्रारीवरुन निवडणुक आयोगाने हा गुन्हा दाखल केला आहे.

दक्षिण मुंबईत जैन समाजाची संख्या मोठी आहे. पयुषण पर्वात जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजविल्याचे विधान त्यांनी भुलेश्वर येथील भाषणात केले होते. त्याविरुद्ध शिवसेनेचे अ‍ॅड. धमेंद्र मिश्रा आणि सनी जैन यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती. तसेच देवरा यांच्या भाषणाची सिडीही पाठविली होती. त्यावर आयोगाने दोन दिवसांपूर्वी देवरा यांच्याकडे खुलासा मागितला होता. त्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश आयोगाने दिल्यावर दोन समुदायांमध्ये निवडणुक काळात तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापुर्वी देखील भाजप, काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षाचे नेते आपल्या भाषणाबद्दल तसेच कृत्याबद्दल अडचणीत आले आहेत. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणुक आयोगाने यापुर्वी दिग्गज नेत्यांना प्रचारास बंदी केली होती. त्यामध्ये उत्‍तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश होता.