काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे ‘गोत्यात’, ‘त्या’ प्रकरणी FIR

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या विद्यमान आमदार आणि आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर निवडणुकीपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. महिला मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून त्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर महिलांना मेकअप बॉक्सचे वाटप केले होते. त्यानंतर त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह आणखी दोन महिला कार्यकर्त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भरारी पथकाचे प्रमुख महापारेषणचे व्यवस्थापक ईश्वर मल्लिनाथ गीडवीर यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी (दि.21) निवडणूक आयोगाने केली. त्याच दिवशी आदर्श आचारसंहिता लागू झाली. आचारसंहिता लागू झाली असताना आमदार प्रणिती शिंदे यांच्या महिला कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.21) दाजी पेठेतील व्यंकटेश्वर नगर येथे महिलांना मेकअप बॉक्स आणि प्रणिती शिंदे यांच्या माहिती पत्रकाचे वाटप केले होते.

याबाबत मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली होती. आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहेत.

Visit : policenama.com