मुंबई : ‘फ्री काश्मीर’ पोस्टर झळकवणाऱ्या मुलीवर FIR दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजधानी दिल्लीत जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध देशभरातून होत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक संघटना, विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे आंदोलनादरम्यान ‘फ्री काश्मीर’ हे पोस्टर झळकवण्यात आले. हे पोस्टर झळकवणाऱ्या महक मिर्झा प्रभू या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सुवर्णा साळवे, फिरोझ मिठीबोरवाला, जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि कार्यकर्ता उमर खालिद यांच्यासह 31 आंदोलकांवर कुलाबा पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आला आहे.

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात विद्यार्थी आणि अनेक युवक – युवती गेटवे ऑफ इंडिया येथे निदर्शने करत होती. यापैकी 31 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे हुतात्मा चौकात आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर देखील एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महक मिर्झा प्रभू हिने फ्री काश्मीर असे लिहलेले पोस्टर झळकावल्या प्रकरणी भादंवि 153 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण दोन एफआयआर कुलाबा पोलीस ठाण्यात तर दोन माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

सोमवारी रात्री गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या निदर्शनादरम्यान फ्री काश्मीर असे पोस्टर झळकावण्यात आले. हे पोस्टर झळकावणाऱ्या मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जेएनयू हल्ला विरोधी आंदोलन फुटीरतावाद्यांचे असल्याचे फ्री काश्मीरच्या पोस्टरमुळे सिद्ध होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. मात्र, आपण काश्मीरमधील नसून मुंबईतील रहिवाशी असल्याचे हे पोस्टर झळकावणाऱ्या महकने स्पष्ट केले. तिने झळकावलेले पोस्टर काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची मगाणीशी सुसंगत असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र, महकने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तरीही आज (मंगळवार) तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/