महापालिकेच्या अतिक्रमण उपायुक्तांसह ६ अधिकाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांसह निरीक्षक व कर्मचारी अशा सहा जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमण कारवाईदरम्यान रामकृष्ण मठासमोरील हातगाडी व त्यावरील माल उचलून नेल्याप्रकरणी व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधव केशवराव जगताप (उपायुक्त, अतिक्रमण विभाग, पुणे महानगरपालिका), मेघा सचिन राऊत (सहायक अतिक्रमण निरीक्षक), गणेश रामचंद्र तारू, सुभाष रामचंद्र जगताप, संजय दत्तात्रय कुंभार, मंगेश गायकवाड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बालाजी रघुनाथ वायकर (शिवमंदिराच्या पाठीमागे) यांनी फिर्याद दिली आहे.

वायकर यांचा हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. सिंहगड रस्त्यावरील रामकृष्ण मठासमोर त्यांची हातगाडी असते. दरम्यान, ३ जानेवारी २०१९ रोजी त्यांची हातगाडी व त्यावरील माल अतिक्रमण विभागाने अतिक्रमण कारवाईत उचलून नेला. त्यांच्याकडे हातगाडीसंदर्भातील परवाना आहे. तरीही तो उचलून नेण्यात आला. असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १५८ (३) नुसार दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक धुमाळे यांनी दिली.