फसवणूक प्रकरण : राम, लक्ष्मण जगदाळेसह १६ जणांवर गुन्हा दाखल

पुणे पोलीसनामा ऑनलाईन – राम जगदाळे धायरीतील जमीन विक्री केलेली असताना देखील जमीनमालकाशी संगनमत करून ती जमीन क्लिअर टायटल असल्याचे भासवून पुन्हा विक्री करत ३३ लाख रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर त्याची विचारणा करण्यास गेल्यावर मी एका नगरसेवकाचा खून केला आहे. तुम्ही परत आलात तर तुम्हालाही ठार मारेन. अशी धमकी दिल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार राम जगदाळे, लक्ष्मण जगदाळे यांच्यासह १६ जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण जगदाळे, राम जगदाळे, बाबा शेख (पुर्ण नाव पत्ता नाही), राजाराम सोनु पोकळे (वय. ५५, रा. जनता वसाहत, पर्वती पुणे), सरूबाई नारायण भोसले (वय. ७०, रा. चऱ्होली), शांताबाई पांडूरंग शिवतारे (वय ६८, रा. वडगाव बु.), पुष्पाबाई अनंता कटके (वय. ६५ रा. वडगाव बु.), दिलीप बबन कोतवाल (वय. ४९, मांजरी), अशोक बबन कोतवाल (वय. ३८, रा. मांजरी), शोभा वसंत पवार (वय ४७, रा. मांजरी), हिराबाई वसंत भांजेकर (वय ६०,रा. आंबेठाण, ता. खेड), संजय वसंत पोकळे (वय ३५, धनकवडी), विमल बाळासाहेब धावले (वय ५०, धनकवडी), वंदना अजय काळे (वय. ३१, रा. मांजरी), निता बाळासाहेब इंगळे (वय ३०, मांजरी), ताराबाई ज्ञानेश्वर पोकळे (वय ६५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम सोनू पोकळे व त्यांच्या इतर नातेवाईकांची धायरी येथे सर्वे नं १४९ मध्ये हिस्सा नं ८ अ /१मध्ये १० गुंठे जमीन होती. ही भागीदारीतील जमीन त्यांनी शिवपार्वती डेव्हलपर्स भागीदार विनोद नरबत मारवाडी, राजेंद्र बाळासाहेब मारवाडी यांना विक्री केली होती. हे माहित असतानाही लक्ष्मण जगदाळे आणि बाबा शेख यांनी जमीन मालक पोकळे यांच्याशी संगनमत करून रविंद्र बऱ्हाटे यांना  ती क्लिअर टायटल आहे असे भासवले. त्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात विकसन करारनामा व कुलमुखत्यार दस्त अन्वये बनावट दस्त तयार केले. त्यानंतर या सर्व करारापोटी २ लाख ९ हजार रुपये मुद्रांक शुल्क, तर ३० हजार ४६० रुपये नोंदणी शुल्क, व जगदाळे यांनी कमीशन म्हणून १ लाख रुपये घेतले. तसेच जागा मालकाला ३० लाख रुपये दिले.

त्यांच्याकडून एकूण ३३ लाख ३९ हजार ४६० रुपये घेतले. मात्र ही जमीन विक्री केलेली असल्याचे बऱ्हाटे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लक्ष्मण जगदाळे यांच्या कार्यालयात याची विचारणा करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी धमकावण्यात आले. लक्ष्मण जगदाळे आणि त्याचा भाऊ राम जगदाळे यांनी पोकळे आणची माणसं आहेत. तो व्यवहार मीच करण्यास सांगितला होता. मी नुकताच एका नगसेवकाचा खून केला आहे. त्यामुळे तुम्ही परत आमच्या कार्यालयात आलात तर तुम्हाला ठार मारेन अशी धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. केसरकर करत आहेत.