25 लाख रुपयांची फसवणूक केल्यप्रकरणी रत्नाकर गुट्टेंविरोधात FIR

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड साखर कारखान्याला करारासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करत गुट्टे यांनी ऊस तोड मुकादमांच्या नावावर कर्ज घेतले. गुट्टे यांनी दोन मुकादमांच्या नावावर परस्पर प्रत्येकी 12 लाख 80 हजार रुपयाचे कर्ज घेतल्याचा आरोप गुट्टे यांच्यावर आहे.

ऊसतोड करणाऱ्या मुकादमाने गंगाखेड साखर कारखान्यासोबत करार करताना बॉण्ड दिले होते. या बॉण्डचा गैरवापर करत कारखान्याने दोन मुकादमांच्या नावे कर्ज घेतले. हा प्रकार समोर आल्यानंतर मुकादमांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. रत्तानकर गुट्टे यांनी प्रभाकर केंद्रे आणि रावण केंद्रे यांच्यावर प्रत्येकी 12 लाख 80 हजार रुपयांचे कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले. या संदर्भात रत्नाकर गुट्टे, गंगाखेड साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि बँक ऑफ इंडियाच्या अंबेजोगाई शाखेच्या व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कोण आहेत रत्नाकर गुट्टे ?
परळी तालुक्यातील दैठणाघाटचे रहिवाशी असलेले रत्नाकर गुट्टे यांनी परळीच्या थर्मल प्लँटवर मजूर म्हणून काम केले. थर्मल स्टेशनमधील छोटे मोठे काम घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते पुढे मोठे कंत्राटदार झाले. सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामे केली आहेत. रत्नाकर गुट्टे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. सध्या ते पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जात असले तरी ते महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षात आहेत.