पुण्यात पार्किंगमध्ये लावलेल्या आगीत 11 गाड्या जळून ‘खाक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इमारतीच्या पार्किंगमध्ये, रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांना आगी लावण्याचे लोण काही केल्या थांबताना दिसत नाही़ पुण्यातील दांडेकर पुलाजवळील विघ्नहर्ता इमारतीच्या पार्किंगमधील गाड्यांना कोणी तरी आग लावली. त्यात ११ गाड्या जळाल्या़ ही घटना पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.

सिंहगड रोडवरील साने गुरुजी शाळेजवळ विघ्नहर्ता ही इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमधील गाड्यांना पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास कोणी तरी आग लावली. अग्निशमन दलाला पहाटे १ वाजून ५२ मिनिटांनी याची खबर मिळाली. त्यांनी तातडीने एरंडवणा व सिंहगड रोडवरील दोन गाड्या घटनास्थळी पाठविल्या.

काही मिनिटातच त्यांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत ६ दुचाकी व एक रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाल्या. तर, ४ दुचाकींना आगीची झळ पोहचली आहे. प्राथमिकदृष्ट्या कोणीतरी जाणिवपूर्वक ही आग लावल्याचे दिसून येत आहे. दत्तवाडी पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने याचा तपास करीत आहेत.


Visit : Policenama.com