‘तो’ कचरा डेपो दिला पेटवून ; खत निर्मिती प्रकल्पाचे लाखोंचे नुकसान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सावेडी येथील कचरा डेपोस स्थानिक रहिवाशी व राजकीय पुढाऱ्यांचा विरोध होता. त्या डेपोस अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने खत निर्मिती प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेचे 28 लाखांचे साहित्य जळून खाक झाले, अशी फिर्याद ठेकेदार संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजरने दिली आहे. त्यावरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासून अहमदनगर महानगरपालिकेने वडगाव गुप्ता रोडवर महानगरपालिका हद्दीत नवीन कचरा डेपो सुरू केलेला आहे. नगर शहरातील सर्व कचरा तिथे संकलित केला जातो. सदर कचरा डेपोस तेथील स्थानिक रहिवाशी व काही राजकीय पुढाऱ्यांचा विरोध आहे. सदर कचरा डेपो येथे कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प महानगरपालिकेने उभारलेला आहे. त्याचे कॉन्ट्रॅक्ट पुणे येथील पी. एच. जाधव यांच्या कंपनीला देण्यात आलेले आहे. सदर कंपनीमध्ये रोहीत कुरणे हे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करीत आहे. सदर प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारे ट्रोमल, कन्व्हेअर बेल्ट, गिअर मोटारी, ऑटो फिडर अशी यांत्रिक उपकरणे आहेत.

3 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वडगाव गुप्ता रोडवर महानगरपालिकेचे कचरा डेपो येथे असलेले खत प्रकल्पास व कचरा डेपोस आग लावण्यात आली. सदरच्या कचरा डेपो हा इतर ठिकाणी हलवावा, या कारणाकरिता कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी ज्वलनशील पदार्थ कचरा डेपो येथे टाकून कचरा डेपोस व प्रकल्पास आग लावली. सदर आगीत पी. एच. जाधव यांच्या कंपनीचे 28 लाख रुपये किमतीचे प्रकल्पाचे यांत्रिक उपकरण जळून खाक झाले. यात अंदाजे 28 लाख रुपये किंमतीचे नुकसान झालेले आहे.

याप्रकरणी ठेकेदार कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रोहित राजाराम कुरणे (वय 29, रा. गणेश कॉलनी, भिस्तबाग चौक, अहमदनगर) यांनी आज तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ठिकाणी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हारुण मुलाणी यांनी भेट दिली होती. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल शिरसाट हे करीत आहेत.