पुण्याजवळील पौडमध्ये फटाक्यांच्या आतीशबाजीनंतर भीषण आग, रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी भस्मसात (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विवाह समारंभात फटाक्यांची आतीशबाजी केल्यानंतर त्यातून लॉन्सच्या बाहेर पार्क केलेल्या चार कारनी पेट घेतल्याची घटना पौड परिसरात घडली. यात दोन कार आगीच्या विळख्यात सापडल्या आहेत. पीएमआरडीए अग्निशमनच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पौड परिसरातील चालेगाव येथे सुभद्रा लॉन्समध्ये रविवारी दुपारी विवाह समारंभ होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. त्यांनी त्यांची वाहने लॉन्सच्या बाहेरील परिसरात पार्क केली होती.

विवाह झाल्यानंतर फटाक्यांची आतीशबाजी करण्यात आली. या फटाक्यांच्या आतीशबाजी मधूनच पार्क केलेल्या दोन कारनी पेट घेतला. काही वेळात कारला आगीने विळखा घातला. नागरिकांनी याची माहिती पीएमआरडीएच्या अग्निशामन दलाला दिली. त्यानंतर अग्निशामक जवानांनी याठिकाणी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत दोन कार आगीच्या विळख्यात सापडल्या होत्या. तर, दुसर्‍या दोन कारनेही पेट घेतला होता.

car burns

जवानांनी पाण्याचा मारा करून अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. परंतु, दोन कार आगीच्या भस्मात पडल्याचे सांगण्यात आले आहे. विवाह समारंभातच अचानक घडलेल्या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला होता. आजू-बाजूला लावलेली वाहने काढण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. फटाक्यांच्या आतीशबाजीतूनच आग लागल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.