तेलंगणात भूमिगत पॉवर प्लाटंमध्ये आग, 8 जण अडकल्याची भीती

पोलिसनामा ऑनलाईन टीम – तेलंगण येथील श्रीशैलम धरणावरील किनार्‍यावर असणार्‍या भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. या आगीमुळे पॉवर प्लांटच्या युनिट चारमध्ये स्फोट झाले. त्यामुळे तेथे 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काल रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

वीज निर्मिती महामंडळाचे कर्मचारी काम करत असताना अचानक आग लागली. त्यावेळी 25 जण कामावर होते. आतापर्यंत 10 जणांची सुटका करण्यात आली असून 8जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिस व अग्निशमक दलाच्या जवानांनी सांगितले आहे. या भूमिगत पॉवर प्लांटमध्ये सहा पॉवर जनरेटर आहेत. चौथ्या पॅनेलमध्ये ही आग लागली.

आग लागल्यानंतर तिथे उपस्थितर अधिकार्‍यांनी विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग विझवण्यात त्यांना यश मिळाले नाही. आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. त्यासोबतच वीज गेल्यानेही अडथळा निर्माण होत होता. राज्य सरकारने यानंतर बचावकार्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली आहे. त्यानुसार बेपत्ता कामगारांचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे .