कानपूरच्या एलपीएस इन्स्टिट्युट ऑफ कार्डिओलॉजीमध्ये भीषण आग; 50 रुग्ण रुग्णालयाच्या इमारतीत अडकले

कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एलपीएस इन्स्टिट्युट ऑफ कार्डिओलॉजीच्या कार्डियोलॉजी विभागात रविवारी आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. आग लागलेल्या इमारतीत ५० रुग्ण अडकले असून त्यांना इमारतीच्या काचा फोडून बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या ९ गाड्या आग विझविण्याचे काम करीत आहेत.

कार्डिओलॉजी विभागातील पहिल्या मजल्यावरील इमर्जन्सी वॉर्डमध्ये सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर ही आग इतरत्र पसरली. संपूर्ण इमारत काचेची असल्याने आग लागल्यानंतर धुर इमारतीमध्ये कोंडून राहिला होता. सर्वत्र धुर पसरल्याने रुग्ण घाबरून गेले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तळमजला व पहिल्या मजल्यावरील काचा फोडून त्यातून रुग्णांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागविला आहे. तत्काळ घटनास्थळाला भेट द्यावी व तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्याचे मुख्य सचिव आलोक कुमार आणि महासंचालक फायर आणि कानपूर आयुक्तांना घटनेची चौकशी करुन सायंकाळपर्यंत अहवाल सादर करा असे आदेश दिले आहेत.