वरळी दूरदर्शन केंद्राला आग, एफएमचं प्रसारण बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत आगीचे सत्र सुरूच आहे. महाराष्ट्राची धमणी असलेल्या मुंबईचा आग पिच्छा सोडत नाहीय असे दिसते आहे. अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या आगीनंतर, मुंबईतील झोपडपट्टीला आग लागली आणि आता आज सकाळी मुंबईतील वरळी दूरदर्शन केंद्राला आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या केंद्रात चालणाऱ्या एफ एम चे प्रसारण बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच केंद्रावरून सह्याद्री वाहिनीचे प्रसारण केले जाते.
आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास वरळीतील दूरदर्शन केंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. आग लागल्यानंतर या केंद्रात एकच धावपळ उडाली. या आगीमुळे या केंद्रात सुरु असेलेले एफ. एम. चे प्रसारण तात्काळ बंद करण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर युद्धपातळीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दूरदर्शन केंद्रातील दुसऱ्या मजल्याचं बरचसं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतं. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून अधिक तपास सुरू आहे.