सुरतमधील मार्केटमध्ये भीषण आग, एकाच ठिकाणी आग लागण्याची 10 दिवसातील 2 री मोठी घटना

सुरत : वृत्तसंस्था – सुरतमधील मार्केटमध्ये पहाटे भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या आग विझविण्याचे काम गेले काही तास करत आहेत. सुरतमधील सालोरी भागातील रघुवीर सेलियम मार्केटमधील एका इमारतीच्या ७ व्या मजल्यावर पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग खालच्या बाजूला सहाव्या मजल्यावरही पसरत गेली. आग मोठ्या प्रमाणावर लागली असली तरी या आगीत अद्याप जीवीत हानी झाल्याचे वृत्त नाही.

रघुवीर सेलियम मार्केटमध्ये अनेक इमारती १० ते १४ मजली उंचीच्या आहेत. या भागात सर्व ठिकाणी प्रामुख्याने कापड व्यापार चालतो. येथील १० मजली इमारतीतील ७ व्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तेथे कपडे असल्यामुळे आग लागल्यावर ती लगेच मोठ्या प्रमाणावर पसरली. आग इतकी भयंकर आहे की, मोठ्या प्रमाणावर धुर झाल्याने अग्निशामन दलाच्या जवानांना आग विझविण्यात मोठ्या प्रमाणावर अडथळा येत होता.

एकाचवेळी ४० गाड्या चारही बाजूने पाण्याचा मारा करुन ही आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळी ८ वाजेपर्यंतही आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला पूर्णपणे यश आले नव्हते.
या भागातील एका इमारतीच्या नवव्या मजल्यावर १० दिवसांपूर्वी आग लागली होती़ त्यानंतर आज ही दुसरी घटना आहे.

फेसबुक पेज लाईक करा –