आग विजवताना अग्निशामक दलाचा एक जवान ठार 

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – कल्याण शहरातील पश्चिम भागात गोल्डन पार्क नजीक असलेल्या एका चायनीज  हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याने आग भडकली. या आगीवर नियंत्रण आणताना अग्निशामक दलाचा एक जवान जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास घडला आहे. अग्नीशमन दलाचे लिडिंग फायरमन जगन आमले यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. फायरमन संदीप पालवे हे हि या आगीत होरपळून गंभीर जखमी झाले आहेत त्यांना कल्याण येथील श्री देवी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रात्री १ वाजून १० मिनिटानी गोल्डन पार्क भागात एका चायनीज हॉटेलमध्ये  गॅस सिलेंडरचा स्फोट झाला क्षणार्धातच आगीने भयानक रूप धारण केले आणि घटना स्थळावर एकच खळबळ उडाली. आधारवाडी येथील अग्निशामक दलाला घटना स्थळावरून फोन आल्या नंतर अल्पावधीत अग्निशामक दल घटना स्थळी दाखल झाले. आग वीजवण्यासाठी अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी मागवले गेले तसेच सुरक्षेसाठी या ठिकाणी पोल्स दलाला हि पाचारण करण्यात आले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील विद्युत पुरवठा हि खंडित करण्यात आला. अग्नीशमन दलाचे लिडिंग फायरमन जगन आमले यांनी घटनास्थळी आल्यावर लगेचच आग वीजवण्याचा प्रयत्न सुरु केला. परंतु हि आग एवढी भयंकर होती कि त्या आगीने  जगन आमले यांचा बळी घेतला आहे.  फायरमन संदीप पालवे हे हि आगीच्या लपट्यांनी होरपळून गंबीर जखमी झाले आणि त्यांना घटना स्थळावरून पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना श्री देवी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

याच महिन्याच्या एक तारखेला (१ नोव्हेंबर २०१८) कल्याण पूर्व भागात एका जुन्या विहरीत बुडालेल्या तीन व्यक्तीना  काढण्यासाठी गेलेल्या अग्निशामक दलाच्या दोन जवानांचा त्या विहरीत बुडून मृत्यू झाला होता.  हि घटना अजून ताजी असताना आज अग्नीशामक दलाचे जवान जगन आमले यांचा मृत्यू झाल्याने कल्याण परिसरात जवानांच्या मृत्यू बद्दल हळहळ व्यक्त केली जाते आहे. तसेच अशा घटनांना पालिकाच जबाबदार आहे कारण अग्नी शामक दला मध्ये पुरेशे मनुष्य बळ नसल्याने मोठ्या घटनेत कुमक कमी पडते आणि त्यातून असे मनुष्य हानीचे प्रकार उदभवतात असा येथील नागरिकांचा पवित्र आहे.