लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तीची अग्निशमनच्या जवानांनी केली सुखरुप सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घाबरलेल्या अवस्थेतील व्यक्तीच्या वडीलांनी फोन करून अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती दिल्यानंतर ५ मिनिटांत त्याची सुटका करण्यात आली.

चेतन ओसवाल (वय ३९) असे सुटका करण्यात आलेल्याचे नाव आहे.

भवानी पेठेतील भवानी माता मंदिरासमोर तिरुपती सहकारी संस्था या इमारत आहे. तेथे विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने लिफ्टमध्ये चेतन ओसवाल अडकले असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली.त्यानंतर तेथे तातडीने मदत पाठवली गेली. जवानांनी तिथे जाऊन पाहिले. तेव्हा पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या मधोमध लिफ्ट अडकली होती. त्यामुळे अडकलेली चेतन आणि त्यांचे वडील खुपच घाबरले होते. जवानांनी त्यांना बोलण्यात गुंतवून धीर दिला. “आता आम्ही आलो आहोत. तुम्ही घाबरु नका. पाचच मिनिटात तुम्ही सुखरुप बाहेर याल” असे सांगितले. नंतर लिफ्ट रुममधे जाऊन जवानांनी तिथे असलेल्या एक चकती टॉमी बारच्या साह्याने फिरवून लिफ्ट पहिल्या मजल्यावर घेतली व युवकाची पाचच मिनिटात सुखरुप सुटका केली.

त्यावेळी तिथे असलेल्या वडिलांना आपला मुलगा सुखरुप बाहेर आला हे पाहून अश्रू अनावर झाले. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांसमोर हात जोडत आभार मानले. तसेच तेथील स्थानिक सभासद मनीषा लडकत यांनीदेखील जवानांचे अभिनंदन केले.

यावेळी दलाचे प्रभारी अधिकारी सचिन मांडवकर, वाहनचालक राजू शेलार, तांडेल राजाराम केदारी, जवान मंगेश मिळवणे, रऊफ शेख, योगेश चोरघे, प्रताप फणसे, अक्षय शिंदे, विठ्ठल शिंदे,रोहीत रणपिसे यांचा सहभाग होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us