Satara News : बसस्थानकात शिवशाहीच्या बसला अचानक लागली आग ! 5 बस जळून खाक (व्हिडिओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – साताऱ्यातील बस स्थानकात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसला अचानक आग लागली. ही आग वाढल्यानं इतर गाड्यांना याची झळ लागली आणि पाच गाड्या या आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु बस जळाल्यानं मात्र कोट्यावधी रुपयांची वित्त हानी झाली आहे. आगीची घटना नेमकी कशामुळं घडली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

 

सातारा शहर बस स्थानकासमोर शिवशाहीच्या 5 बस उभ्या होत्या. यावेळी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास एका बसला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी धावत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशामक दल आणि हॉटेलमधील काही कर्मचाऱ्यांना माहिती देत पाण्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आग एवढी भयानक होती की, काही क्षणातच शेजारी उभ्या असलेल्या बसनेही पेट घेतला. 5 बस यात जळाल्या. यानंतर बस स्थानकात खळबळ उडाली होती.

ही घटना घडल्यानंतर 15 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर पाण्याचे फवारे मारून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पाचही गाड्या तोपर्यंत जळून खाक झाल्या होत्या. ही आग कशामुळं लागली याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी आजूबाजूचे हॉटेल आणि काही प्रवाशांकडे याबाबत विचारणा केली. परंतु यातून कोणतंही कारण समजू शकलं नाही.