Pimpri News : भीषण आगीत 3 दुकाने जळून खाक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अचानक लागलेल्या आगीत पिंपरीत 3 दुकाने जळून खाक झाली. तसेच आगीमुळे शेजारील घरे व इमारतीच्या भिंती देखील काळवंडल्या आहेत. पिंपरीतील मिलिंदनगरमध्ये बुधवारी (दि. 10) पहाटे ही घटना घडली. सुदैवाने आगीत जीवितहानी झाली नसली तरी दुकानांमधील लाखो रुपयांचे साहित्य मात्र खाक झाले आहे. आगीत नेमके किती नुकसान झाले हे समजू शकले नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील मिलिंदनगरमधील किराणा, भंगार, तसेच लाकडाच्या 3 दुकानांना बुधवारी पहाटे अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे तीनही दुकानातील साहित्य किराणामाल जळून खाक झाला आहे. आगीची घटना निदर्शनाश येताच काही नागरिकांनी पहाटे पावणे तीनच्या सुमारास अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानंतर महापालिकेच्या संत तुकारानगर येथील मुख्य अग्निशामक केंद्रातील 3 बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या 14 जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत पहाटे सव्वापाच वाजता आग आटोक्यात आणली. दरम्यान, आगीच्या ज्वाळा व धुराचे लोट यामुळे येथील घरे व इमारतीच्या भिंती काळवंडल्या आहेत.