वडगाव खुर्द येथे नवव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सिंहगड रस्त्यावर वडगाव खुर्द येथील लगडमळा परिसरात असलेल्या मियानी सोसायटीमध्ये नवव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुदैवाने कोणीही जखमी अथवा जिवीतहानी झाली नाही.

वडगाव खुर्द येथे लगडमळा परिसरात मियानी सोसायटीमध्ये १३ मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर सारंग जयस्वाल यांचा फ्लॅट आहे. ते शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास कामानिमित्त फ्लॅटचा कुलुप लावून बाहेर गेले होते. त्यानंतर रात्री त्यांच्या फ्लॅटमधून धूर येत असल्याचे इमारतीतील नागरिकांनी पाहिले. त्यांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रहिवाशाकडे त्यांच्या फ्लॅटची चावी होती. त्यांनीही फ्लॅटमधील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आग वेळेत आटोक्यात आणल्याने ती आजूबाजूला पसरली नाही. मात्र फ्लॅटमधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 

 

You might also like