जामचा मळा भागातील घराला शॉक सर्कीटमुळे आग

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील जामचा मळा येथील खाजा नगरातील एका घरात शॉक सर्कीटमुळे आग लागली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. दरम्यान आग लागली तेव्हा मनपा बंब आग विझविण्यासाठी पोहचलाच नाही.

या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तेव्हा आग लागताच घरातील सर्वजण आरडा ओरड करत बाहेर आले. जवळपास असलेल्या नागरीक व घर मालक यांनी आगीवर पाणी मारा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे काही फरक पडला नाही. यात आग आटोक्यात आणताना आगीच्या झळा लागून वसीम शेख यांच्या हातावर, चेहऱ्यावर त्वचेला इजा झाली आहे.

त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वसीम शेख हे पोंगे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांची घरची परिस्थिती बेताची आहे.

दरम्यान या आगीत घरातील कुलर, पंखा, गादी, कपडे, वह्या, धान्य, मुलांची दफ्तरे संसार उपयोगी साहित्य असे साहित्य जळून खाक झाले.