नीरा बसस्थानकात मालवाहतुक बसला आग सुमारे एक लाखांचे नुकसान

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन ( मोहंम्मदगौस आतार) – नीरा (ता.पुरंदर) येथील बसस्थानकात मालवाहतुकीच्या एस.टी.बसला सोमवारी ( दि.६) रात्री साडे अकराच्या सुमारास अचानक आग लागली. स्थानिक तरूणांच्या व ज्युबिलंट लाईफ सायन्स कंपनीच्या अग्निशामक बंबाने आग विझविण्यास शर्थीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, वाई एमआयडीसी येथून धुळे जिल्ह्यात सोलर वॉटर हिटरचे किंंमती साहित्य एसटी बस क्र एम.एच.१४ बी.टी.०५७६ ने वाहतुक केली जात होती. ही नीरा नदीच्या पुलाच्या पलिकडे पाडेगांव टोलनाक्या जवळ आली असता बसचा टायर पंक्चर झाल्याने चालकाने बस नीरा येथील बसस्थानकात दुरुस्तीसाठी उभी केली.

त्यावेळी अचानक बसच्या मध्य भागातून धूर येत असताना तरूणांना दिसले व काही वेळातच बसने पेट घेतला. त्यावेळी नजीकच्या काही तरुणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच स्थानकात धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न करून बसमधील सोलर वॉटर हिटरचे साहित्य बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसेच बसस्थानका शेजारीच पोलीस दुरक्षेत्र असल्याने पोलिसांनीही बस स्थानकांमध्ये धाव घेत ज्युबिलंट कंपनीच्या अग्निशामक बंबाला पाचारण केल्याने आग आटोक्यात आली. सुमारे दोन तास बसला लागलेली आग विझविण्याचे काम सुरू होते.

दरम्यान , सदरच्या एस.टी.च्या माल वाहतुक बस मध्ये सोलर वॉटर हिटरचे ३१ टाक्या व सुमारे ६०० सोलरच्या काचेच्या नळ्या होत्या. त्यापैकी १३ टाक्यांंचे व एस.टी.चे असे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे एस.टी. च्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पुणे व सातारा विभागाचे विभाग नियंत्रक, बारामतीचे आगार प्रमुख अमोल गोंजारी, सहाय्यक वाहतुक निरीक्षक इसाक सय्यद यांनी नीरा बसस्थानकाला भेट दिली. एस.टी.च्या मालवाहतूक बसला लागलेली आग विझविण्यास स्थानिक तरूण, पोलिस व अग्निशामक दल यांनी तातडीने मदत केल्याबद्दल एस.टी.प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहे.