मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चेंबूर येथील सरगम सोसायटीला लागलेली आग अग्निशमन दलाच्या शर्थीच्या  प्रयत्नानंतर नियंत्रणात आली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. टिळकनगर स्थानकाजवळ ही इमारत आहे. आग लागलेल्या इमारतीचे नाव सरगम सोसायटी आहे. पाचव्या व्यक्तीचे नाव अद्याप समजले नसून आग नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाचा एक जवानाही जखमी झाला आहे.

अग्निशमन दलाला आग लागल्याची सूचना मिळताच १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यांनी अथक प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली असली तरी या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागली त्या घऱात कोणी राहत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. सरगम सोसायटीच्या दहाव्या मजल्यावर रात्री आठच्या सुमारास आग लागली. ही आग काही वेळातच अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या दोन्ही मजल्यांवर अडकलेल्या नऊ रहिवाशांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. मात्र या आगीत सुनीता जोशी (७२), भालचंद्र जोशी (७२), सुमन श्रीनिवास जोशी (८३), सरला गंगर (५२), लक्ष्मीबेन गंगर (८३) या पाच जणांचा मृत्यू झाला. तर छगन सिंग (२८) या अग्निशमन कर्मचाऱ्यासह श्रीनिवास जोशी (८६) यांना धुराचा त्रास झाल्यामुळे राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरातील सिलिंडर आणि एसीच्या स्फोटामुळे ही आग अधिकच भडकली.

तीन दिवसांपूर्वी कांदिवली येथील कापड गोदामाला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला होता. तर अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत अकरा जणांना प्राण गमवावे लागले होते. या दोन घटनांना दहा दिवसही होत नाहीत तोच पुन्हा एकदा आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. भांडुपच्या कुकरेजा कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी सकाळी तीन कार जळून खाक झाल्या. या कारना आग लागली की, लावली गेली याचा तपास भांडुप पोलिस करीत आहेत.