पुण्यात मध्यरात्री साडीच्या दुकानात आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मंतरवाडी चौक परिसरात असलेल्या एका साडीच्या दुकानाला मध्यरात्री एकच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील साड्या जळून खाक झाल्या. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये दुकानातील आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

मंतरवाडी चौकात फुरसुंगी उड्डाणपुल ओलांडल्यानंतर चौकातच कुंकु कन्या नावाचे साड्यांचे दुकान आहे. पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या दुकानाच्या पाठीमागेच साड्या साठविण्यासाठी गोदाम आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास या गोदामात आग लागली. आत कपडे असल्याने आग झपाट्याने पेटली. स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कोंढवा केंद्राच्या २, हडपसर केंद्राची १, मध्यवर्ती केंद्राची १ अशा ४ फायरगाड्या व एक देवदूत घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. २० ते २५ मिनिटांत ही आग आटोक्यात आणली. यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतु आगीमुळे दुकानातील लाखो रुपये किंमतीच्या साड्या मात्र जळून खाक झाल्या. ही आग शॉर्टसर्कटमुळे लागली असल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात येत आहे.

 

ही आग तांडेल मारुती शेलार, नारायण जगताप, फायरमन बाबासाहेब चव्हाण, संपत चौरे, दत्तात्रय चौधरी, संग्राम देशमुख, विशाल यादव, संदिप पवार यांच्या पथकाने आटोक्यात आणली.