तुळशीबागेतील दुकानांना भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील मंडई परिसरातील तुळशीबागेत असलेल्या दुकानांना आज सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आग कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही. ही घटना आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाले नसल्याचे प्राथमिक वृत्त असून या आगीच्या घटनेत किती दुकाने जळाली हे अद्याप समजू शकले नाही.

मंडई परिसरातील वाहनतळजवळ असलेल्या एका दुकानाला आग लागील. आज सुट्टी असल्याने या ठिकाणी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली. दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि दोन पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारुन आग आटोक्यात आणली.

तुळशीबाग हा परिसर नेहमी नागरिकांनी गजबजलेला असतो. या ठिकाणी अनेक प्रकारची छोटी छोटी दुकाने आहेत. आज सुट्टी असल्याने सायंकाळी या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी होती. अचानक लागलेल्या आगिमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच या ठिकाणी वाहन पार्कींग असल्याने वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढचा मोठा अनर्थ टळला. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात वाहतुक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.