एका सिगारेटच्या ‘थोटका’ने 37 हेक्टर वनक्षेत्र जळून ‘खाक’

नाशिक : त्र्यंबकेश्वर या महादेवाचे अधिष्ठान असलेल्या वन परिक्षेत्रातील पहिने गावाच्या शिवारातील राखीव वनक्षेत्रात भटकंतीच्या नावाखाली दोघा तरुणांनी निष्काळजीपणा दाखवून धुम्रपान करत फेकलेल्या सिगारेटाच्या थोटकाने मोठा हाहाकार घडवला. या थोटकामुळे भडकलेल्या आगीचे तांडव तब्बल १२ तास सुरु होते. त्यात ३७ हेक्टर वनक्षेत्रावरील वृक्षराजी जळून खाक झाली.

वनविभागाचे कर्मचारी आणि सुमारे दीडशे ग्रामस्थ यांच्या अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग विझविण्यात यश आले. या आगीत सुमारे ३७ हेक्टरावरील वनक्षेत्र बाधित झाले. तसेच सुमारे २० ते २५ हजार रोपे नष्ट झाल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. दोघा तरुणांच्या निष्काळजीपणाचा फटका बसून या कृत्रिम वणव्यात जैवविविधतेची अपरिमित हानी झाली आहे.