बँक ऑफ इंडियाच्या ‘त्या’ कार्यालयाला आग

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – नंदुरबारमधून आगीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बँक ऑफ इंडियाच्या नंदुरबार शाखेच्या कार्यालयाला रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या घटनेत कार्यालयातील कागदपत्रे व साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे खातेदारांमध्ये खळबळ उडाल्याचे दिसत आहे. बँकेचे हे कार्यालय वर्दळीच्या ठिकाणी आहे.
नंदुरबार शहरातील अमृत चौकात भर वस्तीत बँकेचे कार्यालय असून, रात्री उशिरापर्यंत येथे वर्दळ असते. काल 28 जानेवारीच्या रात्री  साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे लाेकांच्या लक्षात आले. रात्री  साडे अकरा वाजण्याच्या सुमारास बँकेच्या खिडकीतून  प्रचंड  धुराचे लोळ  आणि  अग्नीज्वाळा बाहेर पडू लागल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. यानंतर लगेचच तेथील स्थानिक लोकांनी धावपळ करून  जमेल त्या पद्धतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशामक दलाने येऊन आग आटोक्यात आणली. यानंतर बँकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात येऊन बँक उघडण्यात आली. कार्यालयाची पाहणी केल्यानंतरही आगीमध्ये काय नुकसान झाले याचा प्रत्यक्ष अंदाज अधिकारी देऊ शकलेले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यवस्थापकांची केबिन, दोन संगणक आणि काही कागदपत्रे या आगीत जळून खाक झाले आहेत. मात्र यामध्ये रोख रक्कम सुरक्षित आहे, असे गायकवाड यांनी प्रत्यक्ष भेटीत सांगितले. आज सकाळी यासंदर्भात  बँकेत संपर्क साधला असता बँकेचे प्रमुख व्यवस्थापक उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. व्यवस्थापकीय कर्मचारी मनीष गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची नोंद केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज खातेदारांनी बँकेबाहेर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यासाठी मात्र बँकेतील कोणीही अधिकृतपणे समोर येत नव्हते. बँकेच्या कार्यालयाला कुलूप लावून सर्व कर्मचारी वरिष्ठांच्या सूचनांची वाट पाहत होते.