पत्नीसोबत भांडण, शिक्षक पतीने घरच पेटविले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीसोबत झालेल्या कडाक्‍याच्‍या भांडणातून शिक्षक पतीने घरच पेटवून दिले. आज सायंकाळी राहुरी शहरात ही घटना घडली. घर पेटविल्याचे समजतात घरमालकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी शहरातील मध्यवर्ती भागातील एका इमारतीतील फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर प्राथमिक शिक्षक राहतात. रविवारी सायंकाळी शिक्षक पतीचे पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात संतापलेल्या शिक्षक पतीने घरात रॉकेल ओतून घरच पेटवून दिले. काही क्षणातच आगीचा भडका उडाला. आग लागताच पती-पत्नी घराबाहेर पडले.

फ्लॅटला लागलेली आग पाहताच इमारतीतील रहिवासी व परिसरातील नागरिकांनी इमारतीबाहेर गर्दी झाली. नागरिकांनी अग्निशमन विभागाला कळविले. त्यानंतर काही मिनिटात नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला. काही मिनिटांच आग विझविली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घरमावक तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. गुन्हा दाखल होऊ नये यासाठी शिक्षक व त्याच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

नुकसानभरपाई देऊन टाकू, पण गुन्हा दाखल करू नका, अशी विनवणी शिक्षकाकडून केली जात होती. रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात त्यांच्यात चर्चा सुरू होती.