पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आतापर्यंत १०० झोपड्या या आगीत जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. झोपडपट्टीतील क्रमांक ३ च्या गल्लीमध्ये दुपारी एक वाजून १० मिनिटांनी आग लागली. अग्निशामक दलाच्या ३० गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. झोपडीतील सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता आहे.
पुणे-मुंबई मार्गावर शिवाजी नगर लगत ही पाटील इस्टेट झोपडपट्टी आहे. सहा ते सात सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळे आग आणखी भडकली. धुराचे मोठ मोठे लोट आकाशाच्या दिशेने उठताना दिसत आहेत. आग अधिक पसरु नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पुणे, पिंपरी आणि खडकी कॅन्टाॅन्मेंट बोर्डकडून अग्निशामकदलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. जमलेल्या गर्दीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना काम करताना अडथळे येत आहे. सदर भागात ट्रॅफिक जॅम झाले असून घटनास्थळी ट्रॅफिक पोलीस दाखल झाले आहेत. ही आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. या वस्तीच्या जवळ आद्योगिक वसाहत आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आगीत खूप मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे.