अंधेरीतील अग्नितांडव : कामगार रुग्णालयात पुन्हा आग, तीन दिवसातील दुसरी घटना

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – मुंबईतील अंधेरी एमआयडीसी भागातील कामगार रुग्णालयात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना समोर आली आहे. आजच(बुधवार)  ही घटना समोर आली आहे. सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजत आहे.  रुग्णालयातील मीटर बॉक्सला ही आग लागल्याचे सांगण्यात येते आहे. अग्निशामक दलाचे ३ बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान, सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. यात ९ जणांचा बळी गेला होता. ही घटना ताजी असतानाच तीन दिवसातच ही दुसरी घटना समोर आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1075404239432646656

अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत सोमवारी आग आटोक्यात आणली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. आग लागल्यानंतर धूर कोंडला होता. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने 8 जणांचा मृत्यू झाला होता. आज आणखी एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा नऊ झाला आहे.

अग्नितांडवास रुग्णालय जबाबदार 
दरम्यान या अग्नितांडवास कामगार रुग्णालयाचा गलथानपणा नडल्याने यास सर्वस्वी रुग्णालय जबाबदार असल्याचे समजत आहे. इतकेच नाही तर हॉस्पिटल प्रशासनाची अग्निरोधक यंत्रणा अद्ययावत नव्हती अशी माहितीही समोर आली आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये हॉस्पिटलकडे मुंबई महापालिकेच्या आपत्कालन विभागाने हॉस्पिटलमधील संपूर्ण यंत्रणेची माहिती मागितली होती. मात्र ही माहिती अद्यापही दिली गेली नाही. पालिकेने वारंवार विचारणा करुनही माहिती देण्यास टाळाटाळ झाल्याचे समजत आहे. धक्कादायक म्हणजे गेली दोन वर्ष हॉस्पिटलमधील स्टाफचं आपत्कालीन नियंत्रण/व्यवस्थापनाचे प्रशिक्षण झालेच नाही. हॉस्पिटल स्टाफला आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळायची हे माहितीच नसल्याने मोठं नुकसान झाल्याचं समजत आहे.