‘दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालावी’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची अजित पवारांकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रसार कमी झाला नसून, दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने दिवाळीतील फटाक्यांवर बंदी घालावी,’ अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र पाठवले आहे.

“कोरोनाचे संकट अजून दूर झालेले नाही. ज्यांना श्वसनाचे विकार आहेत, अशा लोकांना कोरोनाचा संसर्ग गंभीर होतो. दिवाळीमध्ये फटाक्यांच्या धुरामुळे अनेकांना श्वसनाचे विकार होतात, असे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. विशेषतः शोभेच्या दारुमुळे वायू प्रदूषण, धूर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अगोदरच काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या दिवाळीत कुठलेही फटाके, शोभेची दारु उडविण्यात बंदी करावी,” असे पत्र अंकुश काकडे यांनी लिहले आहे.

दरम्यान, काकडे यांनी दिवाळीत फटाक्याबरोबर शोभेच्या दारूने वायू प्रदूषण होत असल्याने, शोभेची दारू उडवण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला अजित पवार किती दाद देतात हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.