खंडणीसाठी RTO एजंटच्या कार्यालयात गोळीबार, FIR दाखल

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड शहरामध्ये एका आरटीओ एजंटच्या कार्य़ालयात घुसून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी पिस्तुलाचा धाक दाखवून कपाटातील रोख रक्कम लंपास करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि.9) रात्री दशमेशनगर येथे इंदरपालसिंघ भाटीया यांच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी मंगळवारी (दि.10) इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरून दशमेशनगरमध्ये खंडणीखोर सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.

इंदरपालसिंघ भाटिया हे आरटीओ एजंट आहेत. त्यांचे दशमेशनगर येथील आरतीया कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय आहे. सोमवारी रात्री भाटीया हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह कार्यालयात बसले होते. त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून दोन पिस्तुलधारी कार्यालयात आले. त्यापैकी एकाने पिस्तूलातून गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी फरशीला लागली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गोळीबारीच्या घटनेमुळे कार्यालयातील इतर कर्मचारी घाबरून एका कोपऱ्यात उभे राहिले. त्यावेळी आरोपींनी कपाटातील रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी मंगळवारी सकाळी भाटिया यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी डोईफोडे यांनी पाहणी केली.

यापूर्वी व्यापाऱ्यावर गोळीबार
यापूर्वी कुख्यात हरविंदरसिंघ रिंदा याच्या नावाने व्यापारी, डॉक्टरांना खंडणीसाठी धमकावण्यात आले होते. तर काँग्रेसचे कार्यकर्ते गोविंद कोकुलवार, बारचालक सुरेश राठोड यांच्यासह एका व्यापाऱ्यावर खंडणीसाठी गोळीबार झाला होता. यामध्ये कोकुलवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत. त्यातच सोमवारी रात्री घडलेल्या गोळीबारीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

फेसबुक पेज लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/