निवडणुकीच्या वादातून धुळ्यात गोळीबार ; दोन जखमी

धुळे :  पोलीसनामा ऑनलाईन – धुळे महानगरपालिकेची निवडणूक आमदार अनिल गोटे यांच्यामुळे चांगलीच चर्चेत आली. या निवडणुकीत सर्व पक्ष भाजपाच्या विरोधात एकवटले होते. आता याच वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची महिती मिळते आहे. या हाणामारी दरम्यान गोळीबार झाल्याचेही समजते आहे. या गोळीबारात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांच्यासह एकजण जखमी झाला आहे. यासंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, धुळे शहरातील चितोड रोड वरील नारायण मास्तर चाळीत निवडणुकीच्या ५० जागांच्या  कारणावरून हाणामारी झाली. या भागात भाजपा नगरसेवक संजय जाधव आणि पराभूत उमेदवार अमोल पुकले यांच्या गटात धुसफूस सुरू होती. त्यातच रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास हा वाद उफाळून आला. याच हणामारीदरम्यान गावठी पिस्तुलातुन गोळीबार करण्यात आला. या घटनेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव आणि दुसऱ्या गटाचे दीपक पुकळे हे जखमी झाले आहेत. या संदर्भात शैलाबाई पुकळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार नगरसेवक संजय जाधव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव यांच्यासह जमावा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या म्हणजेच जाधव गटाकडून निकम यांनी फिर्याद दिली असून यात अमोल पुकळे, दीपक पुकळे यांच्यासह जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, ९ डिसेंबर रोजी धुळे महापालिकेसाठी मतदान झाले या निवडणुकीत भाजपाला ५० जागांची आघाडी मिळाली. तर शिवसेनेला केवळ २ जागांवरच समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला १४ तर अनिल गोटे यांच्या नव्या लोकसंग्राम पक्षाला १ जागा मिळाली. एमआयएम ला ४जागा मिळाल्या. महापालिकेत बारा वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. तिला सुरुंग लावण्यासाठी भाजपने या निवडणुकीत “फिफ्टी प्लस’चा नारा दिला होता.