शिवाजीनगर न्यायालयाजवळ रावण गँगच्या दोघांकडून गोळीबार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- शिवाजीनगर न्यायालयाजवळील कामगार पुतळयाजवळ भरदुपारी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात सक्रिय असलेल्या रावण गँगमधील दोघांनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. दरम्यान, शिवाजीनगर न्यायालयाजवळ गोळीबार झाल्याने परिसरासह संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

रावण गँगमध्ये सक्रिय असलेल्या अक्षय साबळे आणि रोहन चांडेल यांनी गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना दिली आहे. गोळीबार झाल्याचे समजताच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, पोलिस उपायुक्‍त सुहास बावचे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्‍त समीर शेख यांच्यासह इतर पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली.

घटनास्थळी पोलिसांना पुंगळी मिळुन आलेली नाही. ही घटना गुरूवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांची पथके रावण गँगमधील अक्षय आणि रोहन यांना शोधण्यासाठी रवाना झाली आहेत. सुरवातीला प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीमध्ये आणि घटनास्थळा शेजारी राहणार्‍यांनी दिलेल्या माहितीमध्ये प्रचंड तफावत होती. त्यामुळे पोलिसांनी घडलेली घटना ही खरी आहे अथवा नाही याबाबत शंका होती. दरम्यान, परिसरातील नागरिकांकडे माहिती घेवुन आणि प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार गोळीबार झाल्याच्या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला.

गोळीबार करणार्‍यांनी हवेत गोळीबार केल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे. शिवाजीनगर न्यायालयाजवळ हवेत गोळीबार झाल्याची बातमी वार्‍यासारखी शहरात पसरली होती. चौकशीअंती पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयाच्या जवळ गोळीबार झाल्याच्या वृत्‍ताला दुजोरा दिला आहे.