मतदानादरम्यान गोळीबार, अश्रुधूराचा वापर

कोलकत्ता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील केवळ ३ मतदारसंघात आज मतदान होत असून त्यातील अत्यंत चुरशीच्या असलेल्या रायगंज लोकसभा मतदारसंघात भाजप आणि तृणमुल काँग्रेस यांच्यातील वादानंतर महामार्ग रोकणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलाला हवेत गोळीबार करावा लागला. त्याअगोदर त्यांनी अश्रुधूराचाही वापर केला होता.

सर्वाधिक चुरस असलेल्या या रायगंज मतदारसंघातील चोपरा येथील बुथ क्रमांक १५९ मध्ये हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी २०१४ मध्ये सीपीएमचे मुहम्मद सलीम यांनी काँग्रेसच्या दीपा दासगुप्ता यांचा केवळ १ हजार ६९४ मतांनी पराभव केला होता. यंदा या ठिकाणी सीपीएमचे विद्यमान खासदार मुहम्मद सलीम, काँग्रेसचे दीप दासगुप्ता, भाजपच्या देबश्री चौधरी आणि तृणमुल काँग्रेसचे कन्हैयालाल अग्रवाल अशी चौरंगी लढत होत आहे.

या मतदार संघात २० टक्के दलित आणि ४० टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यातही बांगला देशींचा समावेश अधिक आहे.
चोपरा येथील बुथ क्रमांक १५९ मध्ये मतदान सुरु झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यकर्ते महिलांना मतदान करुन देत नसल्याचा आरोप करीत तेथून जाणाऱ्या महामार्गावर ठाण मांडून बसले. विद्यमान खासदार मोहम्मद सलीम यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्यासाठी सुरक्षा दलाने प्रथम अश्रुधूराचा वापर केल. तरीही लोक बाजूला हटायला तयार नसल्याचे दिसल्यावर हवेत गोळीबार करत लोकांवर लाठीमार करुन त्यांना पांगविले आहे.