चाकणमध्ये सराईतावर गोळीबार ; चौंघांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वीच्या भांडणातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला. यातील एक गोळी लागल्याने सराईत गुन्हेगार जखमी झाला आहे. हा प्रकार खंडोबा माळ, चाकण येथे सोमवारी रात्री पावणे आकराच्या सुमारास घडला. चाकण पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

संकेत रमेश गाडेकर (२०, रा. खंडोबा माळ, चाकण) याच्यावर गोळीबार झाला असून तो जखमी आहे. तर सोन्या अवताडे, सोन्या आगरकर, रोहन घोगरे, मोनेश घोगरे, प्रतीक सोनवणे, विवेक कुऱ्हाडे, राहुल माने, रवि कळसकर, प्रशांत दातार, स्वप्नील उर्फ सोप्या शिंदे आणि इतर चार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. हा प्रकार आबु बकर मशिदीचे पाठीमागे घडला आहे.

चाकण पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी त्या ठिकाणी गुन्हा दाखल असलेले टोळके आले. मागे झालेल्या भांडणाच्या रागातून सोन्या अवताडे व त्याच्या साथीदाराने हातात कोयते, काठ्या आणि पिस्तुल घेऊन दहशत माजवली. राहुल माने याने कोयत्याने वार केले. सोन्याने संकेतवर गोळया झाडल्या. एक गोळी उजव्या पायाला लागल्याने संकेत जखमी झाला. तर डाव्या खांद्याला कोयत्याने वार केल्याने तो जखमी झाला.

जखमी संकेत आणि गुन्हा दाखल असलेले सराईत गुन्हेगार आहेत. यांच्यावर खुनी हल्ला, मारहाण या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. चाकण पोलिसांनी यातील अनेकांवर तडीपार व कडक कारवाई केलेली आहे. काहींचे प्रस्ताव पाठवले आहेत. घटना घडल्यानंतर चाकण पोलिसांनी तत्काळ तपास करत चौघांना अटक केली आहे. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.