धक्कादायक : मुलीची छेड काढल्याच्या कारणावरुन युवकावर गोळीबार, युवकाचा मृत्यू

मिरी (अहमदनगर) :  पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी तालुक्यातील कामतशिंगवे शिवारात पुर्ववैमन्यासातून झालेल्या गोळीबारात एकजण ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. योगेश एकनाथ जाधव (वय-२५) याचा मृत्यू झाला असून एकनाथ जाधव हे जखमी झाले आहेत. आज (शनिवार) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. पोपट गणपत आदमाने याने कामतशिंगवे शिवारात स्वत:च्या रायफलीमधून योगेश एकनाथ जाधव (वय-२५) व एकनाथ जाधव यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा हे घटनास्थळी हजर झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत योगेश एकनाथ जाधव याच्या विरोधात गेल्या महिन्यात १० ऑक्टोबरला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून योगेश फरार होता. त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी नगर येथील सेशन कोर्टात अपील दाखल केले होते. त्याची सुनावणी दोन दिवसांपूर्वी होऊन त्याला तात्पुरता जामीन मंजूर झाला होता. शनिवारी सकाळी त्याने पाथर्डी पोलीस स्टेशनला येऊन कोर्टाची कागदपत्रे सादर केली होती. या नंतर तो जवखेडे शिवारात आपल्या घरी जाऊन जेवण करत असताना त्या ठिकाणी या घटनेतील आरोपी पोपट गणपत आदमाने हा आपल्या हातात दोन बोअरची रायफल व तलवार घेऊन आला. त्याने योगेश जाधव याच्या मानेवर गोळी झाडली. यामध्ये योगेश जाधव जागेवरच मृत झाला. त्यानंतर आरोपी आदमाने याने आणखी एक गोळी झाडली ती योगेश याचे वडील एकनाथ जाधव यांच्या डाव्या हाताला चाटून गेली. तसेच त्याने हातातील तलवारीने आदमाने याने जाधव कुटुंबातील इतरांना मारहाण केली. यावेळी आदमाने याचा नातेवाईक अनिकेत देवराज मरकड हा देखील घटनास्थळी होता. या वेळी झालेल्या झटापटीत योगेश याची आई नंदा जाधव, बहीण दीपाली जाधव,भाऊ अक्षय जाधव व अनिकेत मरकड हे जखमी झाले तर आरोपी आदमाने हा सुद्धा जखमी झाला.

गोळीबार झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपी पोपट गणपत आदमाने यास अटक केली आहे. आदमाने सैन्यदलातून सेवानिवृत्त झाला असून त्याला मिळालेल्या बंदुकीतून त्याने हा गोळीबार केला.