पुण्यातील हडपसर परिसरातील बँकेच्या सिक्युरिटी गार्डवर फायरिंग, गार्डच्या मृत्यूने परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरातील फुरसुंगी भागातील गंगानगरमध्ये असलेल्या एका नामांकित बँकेच्या सिक्युरिटी गार्डवर गोळीबार करण्यात आला असून गंभीर जखमी झालेल्या गार्डचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज (मंगळवार) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पंचय्या सिध्दय्या स्वामी (६०, धंद्या – सिक्युरीटी गार्ड) असे गोळीबारात मृत्युमूखी पडलेल्याचे नाव आहे. गंगानगर परिसरातील गल्ली नं. १० मध्ये पंचय्या आडवा पडल्याचे काही कामगारांनी पाहिले. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचय्याला लागलीच रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह ससून रूग्णालयाकडे आणण्यात आला. पंचय्या हे परिसरातील एका नामांकित बँकेचे सिक्युरिटी गार्ड असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. त्यांच्या पायामध्ये दोन गोळया लागल्याचे फोटोवरून दिसून येत असले तरी त्यांना नेमक्या किती गोळ्या लागल्या आहेत हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतर समजणार आहे.

गोळीबारात पंचय्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे. हडपसर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम चालु केले आहे. पंचय्या यांच्यावर नेमका कोणी हल्ला केला आणि कोणत्या कारणावरून हल्ला झाला याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

हडपसर सारख्या वर्दळीच्या भागात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गोळीबारात एका बँकेच्या सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली असून त्यांनी देखील तात्काळ गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्याचा आदेश संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिला आहे. प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलिस आणि गुन्हे शाखेचे पोलिस करीत आहेत.

टीप : – आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार परिसरातील दोघांमध्ये वाद होते. त्यांच्या वादातून एकाकडून गोळीबार झाला असून पंचय्या स्वामी यांच्या पायाला गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला.

…..सर्वीस्तर वृत्त थोड्याच वेळात

आरोग्यविषयक वृत्त –