भावाचा जीव वाचविण्यासाठी पुण्यात गोळीबार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – दुचाकीचालकाबरोबर झालेल्या वादातून तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण करत असलेल्या भावाचा जीव वाचविण्यासाठी हवेत गोळीबार करण्याचा प्रकार कोंढव्यात शुक्रवारी रात्री घडला.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुफियान रफिक खान (वय ३३, रा. कौसरबाग, कोंढवा), उबेद सईद खान (वय ३०, रा. रविवार पेठ) आणि अब्दुला रजा शेख (वय २८, रा. क्लाऊड नाईन सोसायटी, कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, अब्दुल दुराज गोरे (वय १९, रा. कोंढवा) हा त्यांची मोटार घेवुन शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता कोंढव्यातील कोणार्क पुरम सोसायटीजवळून जात होता. सोसायटीमध्ये वळण घेत असताना त्याच्या गाडीसमोर एक मोटारसायकलस्वार अचानक आल्याने त्याला गोरे यांनी थांबण्याचा इशारा केला. त्या कारणाने त्याने शिवीगाळ करत हातातील हेल्मेटने मारहाण केली.

त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांना बोलावून घेतले व त्यांना लोखंडी रॉडने मारहान करण्यास सुरुवात केली. मार चुकविण्यासाठी अब्दुला हे पळत सोसायटीत शिरले व पार्किंगजवळ गेले. आरोपीही त्यांचा पाठलाग करत त्यांच्याजवळ पोहचले. त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करु लागले. अब्दुला यांचा आरडाओरडा ऐकून त्यांचा चुलत भाऊ हसन समीर गोरे हा तिथे आला व तेव्हा अब्दुलाने मोठ्याने ओरडून भाई मेरे को बचाओ नही तो ये लोग मुझे मार डालेगे. तेव्हा हसन याने आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. ते पाहून आरोपी पळून गेले. अब्दुला गोरे यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.