धक्कादायक ! ‘त्या’ मानपानावरुन चुलत्याचा पुतण्यावर गोळीबार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथे गावातील जत्रा, बैलपोळा व अन्य सार्वजनिक कार्यक्रमातील मानपानावरून चुलत्याने पुतण्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. यात पुतण्या गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

महादेव उर्फ सुरेश अण्णाराव पाटील (वय ४०) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. महादेव पाटील हा गावातील लायव्वा मंदिराजवळील कॅन्टीनसमोर बसला होता. तेव्हा गावचा सरपंच पिंटू उर्फ अण्णाराव पाटील (वय ३५) हा तेथे आला. त्याने आमच्यावर गुन्हा कशासाठी दाखल केला, असा जाब विचारला. यातून दोघांमध्ये वादावादी झाली.

दोघांमध्ये मारामारी होत असताना, लायप्पा बाबुराव पाटील तेथे आला. त्यानेही महादेव यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने डोक्यात दगड घातला. श्रीशैल बसप्पा पाटील हा धावत आला व त्याने काठीने मारहाण केली. त्यावेळी मंदिरात बसलेले प्रकाश पाटील यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सुरू असताना पिंटू पाटील याला दोघांनी बंदूक आणून दिली. पिंटू पाटील याने बंदूक महादेव पाटील याच्या दिशेने धरून गोळी झाडली. व तेथून पळून गेला.

गोळी महादेव पाटील याच्या पोटात घुसल्याने तो गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडला. प्रकाश पाटील यांनी महादेव पाटील याला तत्काळ जखमी अवस्थेत कारमध्ये घालून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

You might also like