उल्हासनगर : पोलिसांमुळं वाचला जीव ! संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन – ओमी कलानी टीमचे पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक असलेले संदीप गायकवाड (Sandip Gaikwad) यांच्यावर दोघांनी लोखंडी रॉडनं हल्ला करून गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी आल्यानं संदीप यांचा जीव वाचला. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात (Vithalwadi Police Station)गुन्हा दाखल झाला आहे. संदीप बुधवारी रात्री 11 वाजता श्रीराम चौकातून मित्रांसह जात होते. यावेळी कारमध्ये दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला.

संदीप गायकवाड हे उल्हासनगरमधील (Ulhasnagar) ओमी कलानी टीमचे पदाधिकारी आहेत. ते बांधकाम व्यावसायिकदेखील आहेत. इतकंच नाही तर त्यांचं हार्डवेअरचं दुकान आहे. बुधवारी रात्री संदीप जहागीर मोरे नावाच्या मित्रासोबत 11 च्या सुमारास श्रीराम चौकातून घरी जात होते. यावेळी कारमध्ये 2 जण दबा धरून बसले होते. या दोघांनी संदीप यांच्यावर अचानक त्या दोघांनी लोखंडी रॉडनं हल्ला केला आणि गोळीबारही केला. याचवेळी पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी आली. संदीप यांनी याच गाडीचा आश्रय घेतला. त्यादरम्यान हल्लेखोरांनी कारसह पळ काढला. पोलिसांनी या कारचा पाठलागही केला. परंतु उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात कार टाकून हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली. तपासासाठी 3 पथकं तैनात केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

ओमी कलानी टीमच्या मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष असलेले संदीप गायकवाड या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील श्रद्धा हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपाचर सुरू आहेत. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी 2 अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी हल्लेखोर लवकरच जेरबंद होतील असं सांगितलं आहे. संदीप कल्याण मटका जुगार धंदा चालवत असल्याची चर्चा शहरात होताना दिसत आहे. पोलीस तपास सत्य बाहेर येईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

You might also like