सांगवीत कॉलेजच्या विद्यार्थ्यावर गोळीबार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड़ पोलिस आयुक्तालयातील सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री एका 16 वर्षीय कॉलेजच्या विद्यार्थ्यावर अनोळखी व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. गोळी न लागल्याने तो बचावला आहे. गोळीबाराचे नेमके कारण समजू शकले नाही.

राज किरण घुटे (16, रा. जयमालानगर, जुनी सांगवी) याने फिर्याद दिली असून त्याच्यावर गोळीबार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज हा महाविद्यालयीन शिक्षण घेतो. शुक्रवारी रात्री तो ममतानगर येथे आला होता. त्यावेळी त्याच्या दिशेने गोळी झाडण्यात आली. गोळीचा आवाज आल्याने त्याने हालचाल केल्याने तो बचावला. कॉलेज मध्ये पूर्वी त्याची भांडणे झाली होती, यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध घेतला मात्र गोळीबार करणारे सापडले नाहीत.

पोलिस आयुक्तांनी निवडणुकीच्या पाश्वभूमीवर हद्दीतील सर्व गुन्हेगार तपासून बेकायदेशीर पिस्तूल पकडण्याचे सांगितले होते. त्यानंतर अनेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिस्तूल पकडण्यात आले. मात्र ऐन निवडणुकीच्या धामधूम मध्ये सांगवीत गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.

visit : Policenama.com