सांगलीत प्रसिद्ध उद्योजकावर भरदिवसा गोळीबार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्ह्यातील पलूस येथील प्रसिद्ध उद्योजकावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. प्रदिप आनंदराव वेताळ यांच्यावर आज (गुरुवार) दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला. गाडीची काच फुटून गोळी चालकाच्या सीटमध्ये घुसल्याने वेताळ यांचा जीव थोडक्यात वाचला. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वेताळ हे फौंड्री उद्योजक आहेत. त्यांचा पलूस एमआयडीसीमध्ये कारखाना आहे. आज सकाळी ते कारखान्यात गेले होते. कारखान्यातील काम संपवून ते दुपारी जेवणासाठी घरी करमधून जात होते. कारमध्ये ते एकटेच होते आणि स्वत: कार चालवत होते. एमआयडीसीपासून अर्ध्या किलोमीटरवर गेल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेसमोरील घरासमोर आले असता कारच्या डाव्या बाजूने दोघेजण दुचाकीवरून आले. त्यांचा चेहरा रुमालाने बांधलेला होता. दुचाकीवर मगे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर गोळी झाडली.

काच तुटून गोळी चालकाच्या सीटमध्ये घुसली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वेताळ हे खाली वाकल्याने ते थोडक्यात बचावले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिक गोळा झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सहायक निरीक्षक विकास जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वेताळ यांच्याकडे गोळीबाराबाबत चौकशी केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हल्लेखोर कोण होते, गोळीबार कोणत्या कारणासाठी केला. याच उलघडा अद्याप होऊ शकला नाही.